कृष्णभक्त मिराबाई या राजस्थान मधील उच्चकुलीन हिंदु परीवारातील वैष्णव पंथातील एक महत्वाच्या स्त्री संत होत. त्यांची कृष्णभक्ती एवढी प्रसिध्द आहे की त्यांच्या इतकं श्रीकृष्णावर प्रेम करणारं क्वचितच कुणी असेल. श्रीकृष्णावर निस्सीम प्रेम करण्याकरताच त्यांचा जन्म झाला होता असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.
जवळपास 1200 ते 1300 श्रीकृष्णाला उद्देशुन लिहीलेल्या रचना आजही त्यांच्या भगवद्भक्तिची साक्ष देतात.
कृष्णभक्त संत मिराबाई यांची संपूर्ण माहिती
- नाव (Name): मिराबाई
- जन्म (Birthday): सुमारे 1498 राजस्थान
- निर्वाण (Death): सुमारे 1577 व्दारका
- वडिल (Father Name): रतनसिंह
- पति (Husband Name): चित्तोड चे राणा सांगा यांचे पुत्र भोजराज
राजस्थान मधील नागौर जिल्हयात कुडकी नामक गावात मिराबाईंचा जन्म झाला. लहान वयातच मातृवियोगामुळे लहानगी मिरा राव दुदाजी या तिच्या आजोबांच्या छत्रछायेखाली वाढली तिचे वडील रतनसिंह हे मेडतिया जहागिरीचे राठोड होते.
एकदा घरासमोरून जात असलेल्या लग्नाच्या वरातीकडे कुतूहलाने पहात मिराने आपल्या आईला ’माझा वर कोण’ ? असे विचारले असता आई तिला देवघरात घेऊन गेली व भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीकडे बोट दाखवत ’हा तुझा वर’ असे सांगितले.
छोटयाश्या मिरावर या गोष्टीचा एवढा प्रभाव पडला की तिचे जीवनच कृष्णमय झाले. अजाणत्या वयापासुनच ती कृष्णप्रेमात बुडाली. जळी स्थळी काष्ठी पाषाणी तिला गोवर्धन गिरीधारी दिसु लागला.
एका साधुकडुन मिळालेली कृष्णमुर्ती मिरा सतत आपल्या जवळ ठेवत असे. तिने त्या मुर्तीसमवेत स्वतःचे लग्न देखील लावले. कृष्णप्रेमात ती इतकी बुडाली होती की जीवनातील सर्व गोष्टी तीला श्रीकृष्णापुढे नश्वर वाटत असत.
चित्तोड येथील राणा सांगा यांचे चिरंजीव भोजराज यांच्याशी मिराबाईचा विवाह लहान वयातच करून देण्यात आला. स्वतःचा विवाह कृष्णाशी झाला असल्याने तिला भोजराजशी झालेला विवाह मान्य नव्हता तरी देखील कुटूंबाच्या मान मर्यादेकरता तीने तो स्विकारला. घरात मिरा कृष्णभक्ति शिवाय आणखीन कोणत्याही देवतेची पुजा मान्य करीत नसे.
1527 ला झालेल्या लढाईत भोजराज मारला गेल्याने व आजोबा वडिल आणि सासरे यांच्या एकामागोमाग झालेल्या मृत्यु ने मिराबाईने या अशाश्वत आणि नश्वर जीवनाकडे पाठ फिरविली कृष्णभक्तीत स्वतःला वाहुन घेतले.
या दरम्यान अनेक भजनं आणि रचनांची निर्मीती मिराबाईंकडुन झाली. विरह आणि विरक्तीने भरलेल्या त्यांच्या अनेक रचना आजही आपल्याला पहायला आणि ऐकायला मिळतात.
सुरूवातीला मिराबाईंची कृष्णभक्ति ही त्यांची वैय्यक्तिक बाब होती पण पुढे पुढे त्या कृष्णभक्तित तल्लीन होत रस्त्यांवर नाचु लागल्या ही बाब मिराबाईचा सावत्र दिर विक्रमादित्य याला मुळीच आवडत नसे तो चित्तोडचा त्यावेळी नव्यानेच राजा झाला होता.
त्याने मिराबाईला संपविण्याचे अनेक प्रयत्न केले. प्रसादात विष कालवले , फुलांमधे साप पाठविला , बिछान्यावर खिळे रोवले. .. पण प्रत्येक संकटातुन कृष्णकृपेने मिराबाई सहीसलामत वाचल्या. ..
विषप्रयोग केलेल्या दुधाचा नैवैद्य ज्यावेळी मिराबाईने श्रीकृष्णाला दाखवला आणि प्रसाद म्हणुन ते दुध ग्रहण केले त्यावेळी श्रीकृष्णाची मुर्ती विषामुळे हिरवी झाली परंतु मिराबाईला काहीही बाधा झाली नाही. हे पाहुन मिराबाईला खुप वाईट वाटले आणि तीने भगवान श्रीकृष्णाला पुर्ववत होण्यासाठी प्रार्थना केली भगवान पुर्ववत मुर्ती रूपात प्रकट झाले.
रैदास यांना मिराबाईंनी आपले गुरू मानले होते. कृष्णभक्तित तल्लिन झालेल्या ललिता या गोपिकेचा आपण पुर्नजन्म आहोत असं मिराबाईंना वाटु लागले होते.
उत्तर भारतात सर्वदुर मिराबाई कृष्णभक्तिचा प्रसार प्रचार करीत त्यांची भजनं गात फिरल्या 1538 च्या सुमारास त्या वृंदावनात आल्या असाव्यात असा अनेक अभ्यासकांचा अंदाज सांगतो.
आपल्या आयुष्यातील शेवटची वर्षे त्या व्दारका येथे वास्तव्यास होत्या येथेच श्रीकृष्णाच्या चरणी त्या कायमच्या लीन झाल्या. गोवर्धन गिरीधारी गोपाळकृष्णाच्या मुर्तीत त्या लुप्त झाल्या असे सुध्दा अनेक जण सांगतात.