महिला दिनाच्या सुमुहूर्तावर ज्ञानदीप महिला मंडळ या व्हाट्सएप ग्रुपचे नाव ज्ञानदीपच्या संस्थापिका कै. सौ. शुभांगी रानडे याच्या स्मृतीसाठी शुभांगी आयटी प्रशिक्षण मंडळ असे करण्यात येत आहे. तसेच शुभांगी आयटी प्रशिक्षण केंद्र ज्ञानदीपमध्ये सुरू होत असून सौ. वृंदा कुलकर्णी व्यवस्थापक म्हणून कार्य करणार आहेत. या केंद्रात वाचनालय व महिलांसाठी विविध प्रशिक्षण कोर्सेस घेण्यात येतील. – डॉ. सु. वि. रानडे, अध्यक्ष, ज्ञानदीप फौंडेशन, सांगली.

प्रास्तविक

जीवनाच्या सर्व क्षेत्रात सध्या पुरुषांचे वर्चस्व आहे. महिला पुरुषांइतक्याच कर्तबगार असल्या तरी त्यांना कौटुंबिक जबाबदा-यांमुळे घर सांभाळावे लागते. मुलांचे संगोपन करावे लागते. त्यामुळे त्यांच्या कर्तबगारीवर नैसर्गिक व परिस्थितीची बंधने पडतात.

सुदैवाने सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगात महिलांना आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदा-या सांभाळून घरबसल्या इंटरनेटच्या साहाय्याने नोकरी, व्यवसाय करणे शक्य झाले असून आपल्या कलागुणांना वाव देऊन सामाजिक व शैक्षणिक कार्यातही महत्वाचे योगदान देता येऊ लागले आहे.

ज्ञानदीपच्या संचालिका कै. सौ. शुभांगी रानडे यांनी संस्कृत शिक्षिका असूनही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्ये प्राविण्य मिळवून संगणक प्रशिक्षण तसेच मराठी माध्यमातून वेबसाईट आणि सॉफ्टवेअर निर्मितीच्या क्षेत्रात भरीव कार्य केले आहे.या कार्याचा मागोवा घेऊन असे कार्य पुढेही चालू रहावे या दृष्टीकोनातून ज्ञानदीप फौंडेशनने ज्ञानदीप महिला मंडळ या नावाचे केवळ महिलांसाठी एक इंटरनेट आधारित व्यासपीठ सुरू केले आहे व त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ज्ञानदीप फौंडेशनच्या विश्वस्त प्रा. सौ. सरोज गोळे यांचेकडे सोपविली आहे.

श्री. शंकरराव किर्लोस्कर यांच्या ‘स्त्री’ मासिकाच्या मासिकाच्या वाटचालीचा आढावा हा शांता किर्लोस्कर यांच्या लेखावरून(संदर्भः https://www.weeklysadhana.in/view_article/progress-review-of-stree-magazine) असा उपक्रम सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. आता छापील मासिकाऐवजी डिजिटल मिडियावर दृकश्राव्य माध्यमासहित असे व्यासपीठ जागतिक स्तरावर जाऊ शकेल.