सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीकाच नव्हें तर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील आहेत.
या व्यतिरीक्त त्यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हंटल्या जातं. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता खर्ची घातले.
महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणतांना सावित्रीबाईंना अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले
परंतु त्यांनी हार मानली नाही आणि धैर्य खचु न देता संपुर्ण आत्मविश्वासाने संघर्षाला सामोरे गेल्या आणि यश मिळवलेच.
मुलींची पहिली शाळा – First School For Girls in India
सावित्रीबाईंनी 1848 साली, शिक्षणाचे माहेर घर असे ज्याला आपण म्हणतो त्या पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली.
पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मदतीने त्यांना सतत पुढे जाण्याकरता प्रेरणा मिळत होती,
ते त्यांचे फक्त पती नव्हते तर एक चांगले गुरू व संरक्षक देखील होते.
सावित्रीबाईंच्या कार्याचे ते सतत कौतुक करून त्यांचा उत्साह वाढवित असत.
सावित्रीबाई फुले बद्दल थोडक्यात महत्वपुर्ण माहिती –
नाव (Name): | सावित्रीबाई फुले |
जन्म(Birthday): | 3 जानेवारी 1831 |
जन्मस्थान (Birthplace): | नायगांव जि. सातारा |
मृत्यु (Death): | 10 मार्च 1897 |
कार्य(Work): | भारतातील पहिली महिला शिक्षिका एक कर्मठ समाजसेविका त्यांनी समाजातील मागसलेल्या वर्गाकरता |
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाबद्दल माहिती –
सावित्रीबाईंचा विवाह – Savitribai Phule Marriage
सावित्रीबाईंचा विवाह ज्या सुमारास झाला त्यावेळेस बालविवाहाची परंपरा होती आणि त्यामुळे वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी त्यांचा विवाह 12 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्या समवेत करून देण्यात आला.
ज्योतिबांनी केले शिक्षीत – Savitribai Phule Education
त्यांचा विवाह झाला त्यावेळेस त्या शिक्षीत नव्हत्या पण लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहावाचावयास शिकविले.
तो काळ स्त्रियांच्या दृष्टीकोनातुन फारसा चांगला काळ नव्हता त्यांना शिक्षणाची देखील अनुमती नसल्याने सावित्रीबाईंच्या शिक्षणाकरता ज्योतिबांच्या परिवाराने फार विरोध केला.
जुन्या चालिरीतींचा पगडा आणि समाजाच्या भितीने ज्योतिबांच्या घरच्यांनी दोघांना घराबाहेर काढले परंतु ज्योतिबांनी सावित्रीबाईंचे शिक्षण सुरूच ठेवले व त्यांचा प्रवेश एका प्रशिक्षण शाळेत करविला.
समाजाच्या इतक्या विरोधानंतर देखील सावित्रीबाईंनी आपले शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण पुर्ण केल्यानंतर या शिक्षणाचा उपयोग समाजातील महिलांना शिक्षीत करण्याकरता करावा असा विचार सावित्रीबाईंनी केला पण हा विचार एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हतां कारण त्या काळात महिलांना शिक्षणाची परवानगी नव्हती.
या करता सावित्रीबाईंनी खुप संघर्ष केला आणि या रूढी ला तोडण्यासाठी सावित्रीबाईंनी पती ज्योतिबांच्या सहाय्याने 1848 साली मुलींची पहिली शाळा उघडली.
ही शाळा म्हणजे भारतातील मुलींकरता सुरू होणारे पहिले महाविद्यालय ठरले. येथे एकुण 9 मुलींनी प्रवेश घेतला,
सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिका देखील बनल्या. आणि अश्या त.हेने त्या देशाच्या पहिल्या शिक्षीका बनल्या.
सावित्रीबाई म्हणायच्या: वेळ विनाकारण व्यर्थ घालवु नका जा आणि शिक्षण प्राप्त करा!
सवित्रीबाईंची त्याकाळी समाजाकडुन होणारी अवहेलना:
पुढे पुढे शाळेत मुलींची संख्या वाढत गेली. अस्पृश्य समाजातील मुलींची संख्या यात लक्षणीय होती.
या दरम्यान त्यांच्या समस्या वाढत गेल्या सावित्रीबाई शिकविण्याकरता ज्यावेळेस घरून निघत असत त्या दरम्यान शाळा ते विद्यालय हे अंतर पार करतांना त्यांना अनेक कटु अनुभवांना सामोरे जावे लागत असे.
सावित्रीबाईंवर शेण, दगड, कचरा फेकण्यात येते असे, त्यांना शिवीगाळ केली जात असे तरी देखील त्या त्यांच्या निश्चयापासुन डगमगल्या नाहीत, ध्येयापासुन परावृत्त झाल्या नाहीत.
आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा त्यांनी सामना केला आणि स्त्रिशिक्षणाची जाज्वल्य ज्योत आपल्या मनात तेवत ठेवली.
अनेक शाळांची निर्मीती:
पती ज्योतिबा फुले यांच्या मदतीने कुणाचेही आर्थिक सहाय्य न घेता 1 जानेवारी 1848 पासुन 15 मार्च 1852 पर्यंत मुलींच्या शिक्षणाकरता त्यांनी 18 शाळा सुरू केल्या.
1849 ला पुणे इथं उस्मान शेख या मुस्लीम बांधवाच्या घरी मुस्लिम महिलांना आणि लहान मुलांना शिक्षीत करण्याच्या उद्देशाने त्यांनी शाळा सुरू केली.
महिलांच्या शिक्षणाच्या ध्येयाने प्रेरीत सावित्रीबाई सतत या क्षेत्रात काम करीत राहिल्या.
सावित्रीबाईंचे आणि ज्योतिबांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान पाहुन 16 नोव्हेंबर 1852 ला ब्रिटीश शासनाने त्यांचा यथोचित गौरव केला.
इतर क्षेत्रातील कार्य – Savitribai Phule Social Work
केवळ शिक्षण क्षेत्रापुरते त्यांचे कार्य मर्यादित नव्हते.
विधवांची परिस्थीती सुधारावी म्हणुन, बालकांच्या हत्या थांबाव्यात (विशेषतः स्त्रि भृण हत्या) म्हणुन त्यांनी आश्रमाची उभारणी केली दलित आणि अस्पृश्य समाजाकरता त्यांनी कार्य केलं.
कवियत्री सावित्रीबाई – Savitribai Phule As Poet
सावित्रीबाई कवियत्री म्हणुन देखील या समाजाला परिचीत आहेत “काव्यफुले” आणि “बावनकशी सुबोधरत्नाकर” यात त्यांच्या काव्यरचना आज देखील आपल्याला पाहाता येतात.
सावित्रीबाईंचे निधन – Savitribai Phule Death
ज्योतिबा फुलेंच्या निधनानंतर सुध्दा त्या सतत कार्यमग्न राहिल्या आणि समाजाचे ऋण फेडत राहिल्यात.
1897 ला पुण्यात महाभयंकर अशी “प्लेगची” साथ सुरू झाली.
सावित्रीबाईंनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता रूग्णांची सेवासुश्रृषा त्या करीत राहिल्या अश्यातच त्यांना देखील या आजाराने ग्रासले आणि त्यातच 10 मार्च 1897 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
समाजाप्रती त्यांच्या अतुल्य अश्या योगदानाला कधीही विसरता येणार नाही.
महिलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांच्या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कांरानी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि केंद्र सरकार ने त्यांच्या नावाने अनेक पुरस्कारांची निर्मीती केली आणि त्यांच्या सन्मानार्थ एक डाक तिकीट देखील काढण्यात आले आहे.