जे सत्य सुंदर सर्वथा…आजन्म त्याचा ध्यास दे…
या ओळींप्रमाणे सिंधूताईंच्या आयुष्याची वाटचाल आपल्या दृष्टीस पडते. पण आज जरी या वाटेवर फुलांचा मखमली सडा बघणाऱ्यांना दिसत असला तरी या पावलांना काटेरी पायवाट तुडवावी लागली आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जेमतेम 15 महिन्यांचा कालावधी लोटला असेल, 14 नोव्हेंबर 1948 ला आपला देश पंडित नेहरूंचा जन्मदिन “बालदिन” म्हणून साजरा करत होता. आणि त्याच सुमारास वर्धा जिल्ह्यातील नवरगावी गुरे चारणाऱ्या अभिराम साठेंच्या घरात कन्या जन्माला आली.
Read more: अनाथांची माई “सिंधुताई सपकाळ”आयुष्य सुरु झालं खरं पण लाडकी लेक म्हणून नव्हे तर ‘नकोशी’ म्हणून. हे बाळ घरात कधी कौतुकाचा विषय ठरलं नाही.
मुलगी म्हणून कायम हेळसांड आणि दुर्लक्ष तिच्या वाट्याला आलं. ती त्यातही समाधानी होती, काही तक्रार म्हणून नव्हती आणि असती तरी कुणाकडे केली असती.
सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाची कहाणी – Sindhutai Sapkal Story in Marathi
नाव ठेवलं गेलं ‘चिंधी’ (कापडाचा फाटलेला तुकडा) . चाणाक्ष आणि तल्लख बुद्धीच्या चिंधीला शिक्षणाची भारी आवड! वडिलांच्या प्रेमामुळे जेमतेम 4 थी पर्यंत तिला शिक्षण घेता आलं. गुरे चरायला गेल्यावर लहानशी चिंधी संधी साधत शाळेत जाऊन बसे.
तिच्या वडीलांना तिला शिकविण्याची इच्छा होती, परंतु आईचा दुसवास आणि अवहेलना झेलत लहानशी चिंधी कुठपर्यंत मजल मारणार?
जेमतेम 11 वर्षांची असेल तेव्हा चक्क 30 वर्षाच्या श्रीहरी सपकाळ नावाच्या इसमाशी तिचा विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर काही दिवसातच एकभूत आधार असलेलं वडिलांचं छत्र देखील काळाने हिरावून घेतलं.
लहानपणीच लग्न झाल्यावर खेळण्या बागडण्याच्या वयात ती कोवळी पोर तीन लेकरांची आई झाली होती.
गावातील इतर स्त्रियांप्रमाणेच चिंधीचं जगणं देखील शोषण आणि अपमानाने भरलेलं होतं पण तिच्यात एक वेगळेपण होतं, ते म्हणजे तिच्यातील आत्मविश्वास आणि चार चौघात आपलं म्हणणं ठामपणे मांडण्याची निर्भीडता तिच्यात ठासून भरलेली होती.
गावातील जनावरांचे शेण उचलण्याचा मोबदला मिळविण्याकरता ताईंनी पहिलं बंड पुकारलं.
गावातल्या स्त्रियांना न्याय मिळवून दिला. ताईंचा विजय झाला पण गावातल्या जमीनदाराचा अहंकार दुखावला. झालेल्या अपमानाचा त्याला सूड घ्यायचा होता, त्यावेळी चिंधी नऊ महिन्यांची गर्भवती होती, सावकाराने तिच्या पोटातील मूल त्याचे असल्याचे सांगत तिच्या नवऱ्याचे कान भरले.
चिंधीचा नवरा देखील सावकाराच्या सांगण्यात आला आणि चिंधीला बेदम मारहाण करून गोठ्यात फेकून दिले.
Sindhutai Sapkal History in Marathi
अर्धमेल्या अवस्थेत चिंधीने गोठ्यातच एका मुलीला जन्म दिला, एकाकी पडलेल्या चिंधीला काहीही सुचत नव्हते.
बाळाची नाळ कापण्यासाठी जवळ पडलेला दगड उचलून त्यावर वर केले आणि नाळ कापली.
एका कार्यक्रमा प्रसंगी सिंधुताई म्हणतात-
“मला आज देखील आठवतंय, मी त्या नाळेवर दगडाचे सोळा वार केले तेंव्हा ती नाळ कापल्या गेली होती.”
त्यानंतर तिने त्या मुलीला नदीच्या थंड पाण्याने स्वच्छ केलं आणि तिला घेऊन आपल्या विधवा आईचं घर गाठलं. समाजाच्या धाकाने आईने चिंधीला घरातून बाहेर काढलं.
निराधार झालेली चिंधी दहा दिवसांच्या चिमुकलीला घेऊन जीव देण्यासाठी निघाली, वाटेत तिला पाण्याकरता तळमळत असलेला भिकारी दिसला.
त्याला चिंधीने पाणी पाजलं जवळचा भाकर तुकडा दिला. त्या भिकाऱ्याला थोडी तरतरी आली.
या प्रसंगानं तीचं मन बदललं… हे दुसरं जीवन अनाथांना आश्रय देण्याकरता मिळालंय असं तिला वाटून गेलं.
पुढे मुलीला घेऊन ती बस मध्ये चढायला गेली असता कंडक्टरने तिकीटा करता पैसे नसल्याने तिला चढू दिले नाही.
खूप गयावया केल्यानंतर देखील त्याने तिला हाकलून लावले. बस थोडी पुढे जात नाही तोच त्या बस वर आभाळातून कडकडत वीज कोसळली.
चिंधी करता हा पुनर्जन्म होता. तिच्याकरता आता चिंधीचे काही अस्तित्व उरले नव्हते.
ती आता “सिंधू” झाली होती…ती नदी जिच्याविषयी ती लहानपणा पासून ऐकत आली होती.
ती सिंधू जी वाहतांना लोकांच्या आयुष्यात शीतलता प्रदान करते.
अनाथांचे जीणे जगता-जगता सिंधुताई अनाथांची माय झाली, आपल्यासारख्या निराधार अनाथांना गोळा करत माईंनी भिक मागून त्यांची पोटं भरली. परभणी–नांदेड-मनमाड या रेल्वेस्थानकांवर माई दिवसभर भिक मागायच्या आणि रात्री झोपायला स्मशानात जायच्या.
सिंधुताई सांगताना सांगतात कि ज्यावेळी त्यांना भिक मिळायची नाही त्यावेळी त्या स्मशानातील जळणाऱ्या चितेवर भाकरी भाजून खायच्या. अश्या प्रकारे स्मशानातील जळणाऱ्या चितेच्या उष्णतेत त्यांनी स्वतःच जीवन सावरलं.
रात्री-अपरात्री देखील माई रेल्वे स्थानकांवर एकट्या जाऊन अनाथ मुलांना पदराखाली घेत मायेची सावली द्यायच्या.
एक एक रस्त्यावरचं मुल ताई आपलसं करत गेल्या आणि आज जवळ-जवळ 2000 पेक्षा जास्त मुलांच्या सिंधुताई आई झाल्या आहेत.
सिंधुताई देवाकडे मागणं मागतांना म्हणतात :
“देवा आम्हाला हसायला शिकव
परंतु आम्ही कधी रडलो होतो.
याचा विसर पडू देऊ नकोस.”
सिंधुताई या दरम्यान आदिवासींच्या हक्कासाठी देखील लढल्या. एक वेळेला तर आदिवासींच्या मागण्यांसाठी त्या प्रधानमंत्री इंदिरा गांधींपर्यंत देखील पोहोचल्या होत्या. हळूहळू लोक सिंधूताईंना “माई” म्हणून ओळखू लागले आणि स्वतःहून पुढे येऊन त्यांनी स्वीकारलेल्या अनाथ मुलांना दान देऊ लागले.
आता या मुलांना देखील हक्काचे घर मिळाले होते. हळूहळू सिंधुताई इतर अनेक मुलांच्या “माई” झाल्या.
सिंधू ताईंना वाटायचे की पोटच्या मुलीच्या प्रेमामुळे इतर मुलांवर अन्याय व्हायला नको म्हणून त्यांनी आपल्या मुलीचे पालकत्व पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या संस्थापकांना देऊ केले.
त्यांची मुलगी ममता देखील समंजस आणि आईच्या भावना जाणणारी होती.
आईच्या प्रत्येक निर्णयात तिने आईला साथ दिली.
सिंधुताई सपकाळ यांची माहिती
सिंधूताईंचे वक्तृत्व उत्तम असल्याने हळूहळू त्यांची भजनं आणि भाषणं फार प्रसिद्ध होऊ लागली.
- त्यांच्या भाषणाच्या प्रसिद्धीमुळे त्यांना 2009 साली अमेरिकेतून देखील बोलावणे आले होते.
- आपल्या अनाथांच्या संस्थेसाठी ताई विदेशात देखील जाऊन आल्या आहेत.
- वयाच्या 80 व्या वर्षी त्यांच्या पतीने त्यांच्याजवळ येऊन राहण्याचा आग्रह धरला असता ताईंनी आपल्या मुलाच्या रुपात त्यांना स्वीकारलं.
- आणि म्हणाल्या “आता माझ्यात केवळ आईपण उरलंय बाईपण नाही”
- आज सिंधूताईंना 2000 पेक्षा जास्त मुलं आहेत. त्यातील काही वकील, कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर तर कुणी समाजसेवक देखील आहेत. त्यांचा एक मुलगा तर सिंधूताईवरच PHD करतोय.
- त्यांची कन्या ममता या आपल्या आईप्रमाणेच ‘ममता बाल सदन’ नावाचे अनाथ आश्रम चालवतायेत.
- आपल्या मुलीचा जन्म गाईच्या गोठ्यात झाला आणि गाईनीच तिचं रक्षण केलंय या भावनेने सिंधूताईंनी वर्धा जिल्ह्यातील नवरगावी ‘गोपिका गाय रक्षण केंद्र’ सुरु केलं.
- या गोरक्षण संस्थेत आज जवळ-जवळ 200 गायींना संरक्षण मिळालंय.
- पुण्यातील हडपसर भागात असलेली ताईंच्या ‘सन्मती बाल निकेतन संस्थेत‘ अनेक अनाथ मुलांना आश्रय मिळाला आहे. त्यांची काळजी घेण्याकरता ताईच्या 20 मुलांना नियुक्त करण्यात आलं आहे.
- चीखलदरा इथे मुलींसाठी ‘सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह‘ निर्माण करण्यात आले आहे शिवाय वर्धा येथे आपल्या वडिलांच्या नावाने ‘अभिराम बाल भवन‘ ची स्थापना केलीये.
सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट – Sindhutai Sapkal Movie
750 पेक्षा अधिक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या सिंधूताईंच्या जीवनाने निर्माता-दिग्दर्शक अनंत महादेवन एवढे प्रभावित झाले की त्यांनी माई वर आधारीत “मी सिंधुताई सपकाळ” नावाचा चित्रपट तयार केला होता.
या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. 54 व्या लंडन फिल्म फेस्टिवल मध्ये देखील हा चित्रपट दाखवण्यात आला आहे.
या व्यतिरिक्त त्यांच्यावरील पुस्तक ‘मी वनवासी’ आणि एक डॉक्युमेंट्री फिल्म ‘अनाथांची यशोदा’ देखील तयार करण्यात आली.
कवितांची आवड असलेल्या सिंधूताई म्हणतात…
“लकीर की फकीर हुं मै, उसका कोई गम नही,
नही धन तो क्या हुआ, इज्जत तो मेरी कम नही!”
सिंधुताई सपकाळ याचं निधन – Sindhutai Sapkal Death
अनाथांची माई म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचा ४ जानेवारी २०२२ रोजी पुण्यातील एका खाजगी हॉस्पीटल मध्ये निधन झाले.
हर्नियाचा त्रास असल्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील हॉस्पीटल मध्ये उपचार सुरु होते परंतु अखेर ४ जानेवारी ला अनाथांची माय हरपली.
माझी मराठी टीम कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.